Sanjay Raut on Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?

Sanjay Raut on Bhaskar Jadhav: दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते. दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ राहत नाही, असं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं आहे.
Sanjay Raut on Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यासाचे संकेत दिले होते. “आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं,” असे त्यांनी म्हटले होते तर महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. आता भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने खळबळ उडवली आहे. “दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते. दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ राहत नाही,” असे सूचक स्टेटस त्यांनी ठेवले आहे. नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांनी असे संकेतपूर्ण स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना चांगलेच उधाण आले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, चांगली वाक्य आहेत. इंटरेस्टिंग वाक्य आहेत. भास्कर जाधव हे चांगले वाचक आहेत. त्यामुळे त्यांची भाषा अत्यंत वैभवशाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळाले नाही. सुनील राऊतांना देखील स्थान मिळाले नाही. त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? पक्षाची भूमिका आहे. सरकार आणण्यासाठी आमच्या कुटुंबाचं योगदान होतं. पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात घेतले नाही. मोजक्या जागा असतात, तीन पक्षाचे सरकार होते. आपण समजून घेतले पाहिजे. आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले आणि ते सोडून गेले. चाणाक्ष, हुशार, तडफदार असे अनेक होते. त्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा पक्षाने निर्णय घेतला आणि आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो, असे त्यांनी म्हटले.