Sanjay Raut: बोलबच्चन प्रेरणा आम्ही मोदींकडून घेतली, ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत; संजय राऊतांचा फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार

Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले की, फडणवीस स्वत: ज्युनिअर बोलबच्चन आहेत. त्यांना अजून ते जमत नाही ते उघडे पडतात. मात्र मोदी दररोज उघडे पडत आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये बोलताना भाजपला जाहीर आव्हान दिले होते. त्यांनी किल मी म्हणत भाजपला अंगावर येण्याचं ओपन चॅलेंज देत सोबत येताना ॲम्बुलन्स घेऊन या असा सुद्धा आव्हान दिलं होतं. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करतानाच बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना उत्तर देत नसल्याचे म्हटलं होतं. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या बोलबच्चन वक्तव्यावर खोचक टोला लगावला आहे.
आम्हाला ते बोलबच्चन म्हणत असतील, तर ती मोदींकडून प्रेरणा घेतली
संजय राऊत म्हणाले की, आम्हाला ते (फडणवीस) बोलबच्चन म्हणत असतील, तर ती मोदींकडून प्रेरणा घेतली आहे. ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जगाच्या बोलबच्चन करणाऱ्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांचे ते अध्यक्ष आहेत. पूर्वी आमचे त्यांच्याशी संबंध होते, त्यामुळे काही गुण आले असतील, असे म्हणत संजय राऊत यांनी पलटवार केला. मोदी बोलबच्चन असले तरी ट्रम्प यांनी भारत पाक युद्धबंदी आम्ही केली असे 18व्यांदा म्हणूनही त्यांच्या वक्तव्यांवर अजूनही मोदींची दातखिळी बसली असल्याची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली.