६ जुलै रोजी कुरुंदवाड येथे चौथी ‘पूर परिषद
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना दरवर्षीच्या महापुरापासून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी ‘आंदोलन अंकुश’ संघटना आणि ‘कृष्णा पूर नियंत्रण नागरी समिती’च्या वतीने मागील चार वर्षांपासून सातत्याने जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून यंदाची चौथी ‘पूर परिषद’ रविवार, ६ जुलै रोजी कुरुंदवाड येथील कृष्णा संगम घाटावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा पूर नियंत्रण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
२००५ पासून सलग येणाऱ्या महापुरामुळे शेकडो कुटुंबे उध्वस्त झाली असून, यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर २०२२ पासून पूरग्रस्तांसाठी ‘आंदोलन अंकुश’ या संघटनेतर्फे पूर परिषदा घेतल्या जात आहेत. यंदाच्या परिषदेत आलमट्टी धरणाची उंची वाढ रोखणे, जागतिक बँकेच्या निधीचा योग्य वापर करून पूर नियंत्रण उपाययोजना यावर सखोल चर्चा होणार आहे.
या परिषदेसाठी पूर अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. आलमट्टी आणि हिप्परगी धरणांमुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत कायदेशीर लढा कसा देता येईल, याविषयीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अनियंत्रित आणि बेकायदेशीर पाणी साठवणीमुळे दरवर्षी पाण्याचा विसर्ग वाढतो आणि महापुरासारखी स्थिती उद्भवते. त्यामुळे सरकारने कर्नाटकविरोधात ठाम भूमिका घ्यावी, अशी या संघटनांची मागणी आहे.
सरकारचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधण्यासाठी आणि जनतेला वस्तुस्थिती समजावून देण्यासाठी होणारी ही पूर परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे रविवार, ६ जुलै रोजी सकाळी कुरुंदवाड येथील कृष्णा घाटावर होणाऱ्या या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘आंदोलन अंकुश’ संघटना व कृष्णा पूर नियंत्रण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील, राकेश जगदाळे, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, निवृत्त जिल्हा अभियंता प्रदिप वायचळ, कृष्णा पूर नियंत्रण समितीचे संजय कोरे, निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर कुंभार, संभाजी शिंदे, अवधूत काळे, गोपाळ चव्हाण, दिलीप माने, अनिल हुपरीकर, रघु नाईक, उद्धव मगदूम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.