Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल

मुंबईतील नालेसफाईत हातसफाई केली जात असून मिठी नदीत अजून गाळ तसाच असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला.
मुंबई : मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी 74 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात आरोग्य विभागासाठी 7 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी वांद्रे येथील भाभा रुग्णालयाला भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, “वांद्रे पश्चिम येथे के. बी. भाभा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत सध्या 436 खाट आहेत. या इमारतीत कॅथलॅब, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डियाक व ब्लड बँक या सुविधा पुरवल्याशिवाय रुग्णालयाचे उद्घाटन करणार नाही अशी ग्वाही महापालिकने दिली होती. परंतु आजपर्यंत या सुविधा सुरु केलेल्या नाहीत.”
बीएमसीतील राज्य सरकार नियुक्त प्रशासक राज मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. 7 हजार कोटी रुपयांची तरतूद असताना मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सुविधा का मिळत नाहीत? हे पैसे कोणाच्या खिशात जातात याचे उत्तर राज्य सरकार व बीएमसी प्रशासकाने द्यावे असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?
खासदार वर्षा गायकवाड यांनी मिठी नदीचीही पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बीएमसी व राज्य सरकाराच्य कामावर तोफ डागली. खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः मान्य केले आहे की, यावर्षी मिठी नदीची सफाई केवळ 55% पूर्ण झाली आहे. संपूर्ण मुंबईत नाल्यांची सफाई पाहिली तर ती, केवळ 68% पूर्ण झाली आहे. याचे विपरीत परिणाम आपल्याला पहिल्याच पावसात स्पष्टपणे दिसून आले आहेत.”
काही वर्षांपूर्वी मिठी नदी सफाईतील भ्रष्टाचाराबाबत कारवाई करत असल्याचे ढोल यांनी सरकाराने बडवले, पण आजची परिस्थिती काय सांगते? आज काँग्रेसच्या सहकाऱ्यांसोबत मिठी नदी परिसराला भेट दिली असता अजूनही नदीत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून आला. महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने उत्तर द्यावं की त्यांच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांना पूर परिस्थितीची समस्या अजून किती काळ सहन करावी लागणार आहे? आणि या बेजबाबदारपणाला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई कधी होणार? अशी विचारणा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.