महाराष्ट्र

Sanjay Raut on India Pakistan War Mock Drill : युद्धसराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का? एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on India Pakistan War Mock Drill : एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या. किती दिवस अशी टांगती तलवार ठेवणार? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut on India Pakistan War Mock Drill : केंद्र सरकारने (Central Government) संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉकड्रीलचे (Mock Drill) निर्देश दिले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी उद्या बुधवारी (दि. 7) करणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.

संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानने किंवा दहशतवाद्यांनी आमच्या 27 लोकांचा बळी घेतला. त्या संदर्भात प्रतिकार किंवा बदला काय? हा प्रश्नच आहे. दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत. आपल्याला जपानने पाठिंबा दिला आहे. पुतीनने पाठिंबा दिला आहे, अशा चर्चा आहेत. उद्या जनतेचा युद्धसराव आहे. आम्ही त्यालाही तयार आहोत. युद्धसराव अनेक देशांमध्ये होत असतो. विशेषतः ज्या देशांना सातत्याने युद्धाची भीती असते त्यांना युद्धसराव करावा लागतो. जनतेला त्यात सहभागी करून घ्यावे लागते. भारतामधील जनता तेवढी अज्ञानी नाही. 1971 सालची परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे. तेव्हा दळणवळणाची साधने देखील कमी होते. भारत पाकिस्तानचं युद्ध झालं पण त्यापेक्षा मोठे युद्ध आपण लढलो ते म्हणजे कोरोनाचे युद्ध. भारताची जनता ही मानसिक दृष्ट्या मजबूत आहे.

आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का?

या सगळ्या गोष्टीत तुम्ही जनतेला मानसिक दृष्ट्या अडकून ठेवले आहे. अनेक देशात आम्ही पाहिले आहे की, एखाद्या नागरिकांवर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाला की 24 तासात बदला घेतला जातो. आता आमचा युद्धसराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहात का? भोंगे वाजणार आहेत, ब्लॅक आऊट होणार आहे. महत्त्वाच्या गोष्टी झाकून ठेवल्या जातील. आम्ही 1971 साली हे पाहिले आहे. याची माहिती लोकांना वेगळ्या माध्यमातून दिले जाऊ शकते. जशा थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, तसा आता युद्ध सरावात अजून एक दिवस घालवतील, असा हल्लाबोल त्यांनी केला.

तुम्ही मॉकड्रील घेत राहा, पण…

संजय राऊत पुढे म्हणाले की, आता आमच्या सैन्याचा युद्धसराव सुरू आहे. सैन्य हे कायम सज्ज असले पाहिजे, भारतीय सैन्य हे कायम सज्ज आहे. राष्ट्रपतींना हे माहित आहे की नाही हेच मला माहिती नाही. राष्ट्रपती या तिन्ही सेना दलांच्या प्रमुख आहेत. पंतप्रधान नव्हे तर राष्ट्रपती प्रमुख आहेत. तुम्ही ताबडतोब भारत पाकिस्तानचा तणाव आहे. त्याचा फटका भारताला भविष्यात आर्थिकदृष्ट्या बसण्याच्या शक्यता आहे. देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे. ते तुम्ही आहेत म्हणून नाही तर हा देश आहे. एक व्यक्ती नेतृत्व करत आहे. एक पक्ष नेतृत्व करत आहे म्हणून नाही हा देश सदैव लढायला सज्ज आहे. तुम्ही मॉकड्रील घेत राहा पण दाखवा तुम्ही काय करत आहात, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या

पाकिस्तानचे संसदेचे विशेष अधिवेशन भरले आहे. आमची तर पहिल्या दिवसापासून मागणी आहे की काश्मीरच्या प्रश्नावर दोन दिवसाचे संसदेचे विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे. सगळ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत होतं तसं नाही. आम्हाला उणीधुनी काढायच्या नाहीत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही पक्षासोबत नाही. त्यामुळे एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या. किती दिवस अशी टांगती तलवार ठेवणार. पुढील जे परिस्थिती निर्माण होईल त्याबाबत तुम्ही या देशातल्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन काम केले पाहिजे. युद्ध सोपे असते पण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते त्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे आहे. पण याआधी देशाचे अपयशी गृहमंत्री अमित शाह यांना पुढील परिस्थिती सांभाळता येणार नाही. त्यामुळे त्यांना पदावरून हटवायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button