Raj Thackeray on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर नंतर कौतुक सोडाच पण राज ठाकरेंनी मोदींच्या कारभाराचे वाभाडे काढले, म्हणाले, युद्ध अन् एअर स्ट्राईक उत्तर नव्हे

Operation Sindoor: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात साजऱ्या होत असलेल्या आनंदात सहभागी न होता पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला खडे बोल सुनावले
मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानांच्या साहाय्याने क्षेपणास्त्रांचा (Air Strike) मारा करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहीमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. या मोहीमेतंर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अजहर यांच्या कुटुंबीयांसह तब्बल 90 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्र सरकारच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
Raj Thackeray: राज ठाकरेंची मोदी आणि केंद्र सरकारवर टीका
राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. तो दौरा अर्धवट सोडून ते भारतात आले आणि थेट बिहारला प्रचाराला गेले. ही गोष्ट करण्याची गरज नव्हती. त्यानंतर मोदी केरळमध्ये अदानींच्या बंदराचे उद्घाटन करायला गेले. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्हेव कार्यक्रमाला उपस्थिती लावली. इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी टाळता आल्या असत्या, असे खडे बोल राज ठाकरे यांनी सुनावले.
नाक्यानाक्यावर ड्रग्ज मिळतायत. ते येतायत कुठून? का येतायत? लहान लहान पोरं ड्रग्ज घेतायत. शाळेतली पोरं ड्रग्ज घेतायत. ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलतायत, इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती, असेही राज ठाकरेंनी म्हटले.