Opration Sindhoor: भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली पण भारतीय वायूदलाचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; नागरिकांना महत्त्वाचं आवाहन

Opration Sindhoor: युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायूदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Opration Sindhoor: भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan War) तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल (10 मे) सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली. मात्र युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायूदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) अजूनही संपलेलं नाही, अशी अधिकृत भूमिका भारतीय वायूदलाकडून (Indian Air Force) स्पष्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायूदलानं चोखपणे बजावली आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील भारतीय वायूदलाने म्हटलं आहे.
शस्त्रसंधी केल्यानंतरही पाकिस्तानकडून गोळीबार-
भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासांत सीमेवर गोळीबार करत, पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पुन्हा एकदा सीमेलगतच्या चार राज्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले. मात्र त्यांचा हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावला. मुजोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा देण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पाकच्या हालचालींवर नजर असून, सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती दिली.
राज्यातील सिव्हिल डिफेंस यंत्रणेला अलर्ट मोडवर-
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर, तात्काळ केंद्रीय गृहमंत्रालयात बैठक बोलावण्यात आली. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह सचिवांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जवळपास सर्वच राज्यांचे मुख्य सचिव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक राज्यातील सिव्हिल डिफेंस यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसंच सीमेला लागून असलेल्या राज्यांनाही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन- डोनाल्ड ट्रम्प
हजारो वर्षांच्या काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर केलं. अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान आहे. संघर्षात लाखो जीव गेले असते, खूप नुकसान झालं असतं, असं ट्रम्प म्हणाले. तसंच भारत-पाकनं शस्त्रसंधी केल्याने दोन्ही पंतप्रधानांची प्रशंसा केली. तुमचे धाडसी निर्णय,तुमच्या परंपरेला साजेसे असल्याचं ट्रम्प म्हणाले. तसंच दोन्ही देशांसोबत आता खूप व्यापार वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.