MP Dhairyasheel Mane on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली, कोल्हापुरात नक्षलवादी तयार होतील; खासदार धैर्यशील मानेंचं चक्काजाम आंदोलनात वक्तव्य

MP Dhairyasheel Mane on Almatti Dam : धैर्यशील माने म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांना जलसमाधी मिळेल. मी केंद्र सरकारकडे भूमिका मांडणार आहे.
MP Dhairyasheel Mane on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली, कोल्हापुरात नक्षलवादी तयार होतील, असे वक्तव्य खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापुरात चक्काजाम आंदोलनात केले. प्रस्तावित अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात आज (18 मे) आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी चक्काजाम आंदोलनात हे वक्तव्य केलं.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जलसमाधी मिळेल
धैर्यशील माने म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांना जलसमाधी मिळेल. आता धरणाच्या उंची वाढवण्यास स्थगिती मिळाली ती महाराष्ट्रामुळे नाही तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा यांच्यामुळे मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका मी केंद्र सरकारकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
21 मे रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सोबत मंत्रालय स्तरावर बैठक
दुसरीकडे, अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र सरकारचा तीव्र विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर 21 मे रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सोबत मंत्रालय स्तरावर बैठक होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील संवेदनशील आहेत. जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या सर्व उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
अलमट्टी धरणाचा पश्चिममहाराष्ट्राला धोका
दुसरीकडे, अलमट्टी धरणामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती गंभीर बनते. विशेषतः सांगली, मिरज आणि शिरोळ तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाते. त्यामुळे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मालमत्तेचही प्रचंड नुकसान होते. जीवितहानीचाही मोठा धोका असतो. 519 मीटर उंची असताना ही स्थिती आहे. जर अलमट्टीची उंची सहा मीटरने वाढवून ती 524 मीटर केली तर महापुराच्या पाण्याची फूग आणखी वाढून स्थिती भयावह होणार आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढविण्याला या दोन जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे.