Ajit Pawar: अजित दादांनी कंत्राटदाराला धरलं धारेवर; वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या मुद्यावरून सुनावले खडे बोल

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आज (19 मे) प्रथमच परळीच्या दौऱ्यावर आहेत.
Ajit Pawar in Parli : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आज (19 मे) प्रथमच परळीच्या दौऱ्यावर आहेत. परळीतील विविध विकास कामे आणि महत्वपूर्ण बैठका आणि बीड (Beed) जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित दादांनी बैद्यनाथ (Vaidhynath Jyotirling Temple) येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी करण्यात आलेल्या विकास कामाची पाहणी केली असता यावेळी अजित दादांनी कंत्राटदाराला धारेवर धरत खडे बोल सुनावल्याचे बघायला मिळाले आहे. बैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेत विचारणा केली आहे. बैद्यनाथ मंदिरांच्या पूर्वेला असणाऱ्या द्वारासमोरील पायऱ्याचे काम सुरू आहे. काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला अजित पवारांनी पायऱ्याच्या कामाच्या दर्जावरून सुनावले आहे.
वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा चे कन्सल्टंट कृष्णकुमार बांगड यांनी या विकास आराखडा बाबतची माहिती दिली. यावेळी मंदिराच्या पूर्व द्वारासमोर असलेली दगडी कमान, क्यू कॉम्प्लेक्स, हरिहर तीर्थ, साऊंड अँड लाईट शोची जागा,प्रदक्षिणा मार्ग, मेरूगिरी उद्यान या कामांची माहिती अजित पवार यांनी जाणून घेतली. यावेळी श्री बैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार यांचे जंगी स्वागत,शंभर किलो फुलांचे हार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर प्रथमच परळी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून त्यांचे जंगी स्वागत केलं गेलंय.या वेळी परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक,राणी लक्ष्मीबाई टावर आणि वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये शंभर शंभर किलो फुलांचे हार क्रेनवर लावण्यात आले होते. परळी वैजनाथ येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी करण्यात आलेल्या विकास कामाची पाहणी अजित पवार करणार आहेत आणि त्यानंतर शासकीय विश्रांती येथे परळी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी आढावा घेतला आहे. आज उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.
वैद्यनाथ मंदिरात तिन्ही नेत्यांकडून रुद्राभिषेक
उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाला मंत्राच्या जयघोषात रुद्राभिषेक केलाय. यानंतर महाआरती करण्यात आली.