गुडन्यूज! मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही; महापालिकेचा निर्णय, धरणात किती साठा उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
Mumbai Water Supply : वाढत्या तापमानामुळे आणि परिणामी वाढलेल्या बाष्पीभवनामुळे मुंबईला (Mumbai News) पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या धरणांतील साठा काहीसा कमी झाला आहे. मात्र, मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्र शासनाने ‘निभावणी साठ्या’तून (Contingency Reserve) मुंबईसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिले आहे.
सध्याच्या परिस्थितीनुसार, 31 जुलै 2025 पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणारे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी कपातीचा कोणताही विचार सध्या करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, हवामान विभागाशी (IMD) सातत्याने समन्वय साधून पावसाच्या (Rain) संभाव्य स्थितीचा विचार करून पुढील निर्णय घेतले जातील, असेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जलाशयांमध्ये किती साठा?
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी आज (दि. 5 मे 2025) महापालिका मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. 5 मे 2025 रोजी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये एकूण 22.66 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाने भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांतून ‘निभावणी साठ्या’तून (Contingency Reserve) अतिरिक्त पाणीपुरवठ्यास मान्यता दिली आहे.
मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर, मुंबईसाठी 31 जुलै 2025 पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणारे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पाणीकपात करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे. धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर महापालिका प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे. तसेच, पावसाच्या आगमनाविषयी हवामान खात्याशी समन्वय साधून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, मुंबईकर नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.