महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
कोल्हापूर : जिल्हाधिकार्यांच्या दारात वृद्ध मातेचा टाहो

दोन्ही मुलांनी काढले घराबाहेर; प्रशासनाने घेतली तत्काळ दखल
कोल्हापूर : काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले. पण, आईचा सांभाळ करण्याऐवजी दोन्ही मुलांनीच घराबाहेर काढले. राहायचं कुठे, खायचं काय… असा सवाल करत न्यायासाठी मंगळवारी एका 70 वर्षीय वृद्ध मातेने जिल्हाधिकार्यांच्या दालनासमोर टाहो फोडला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना भेटून या वृद्धेने आपली कैफियत मांडली. चांगले घर आहे. त्यात दोन मुले आपल्या पत्नी, मुलांसह राहतात. आपण मात्र घरामागील पडीक जागेत राहतो. मिळेल ती मजुरी करतो. त्यातून जे मिळते त्यावर गुजराण करतो. पण मुलांना दया येत नाहीच. आता पाऊस सुरू होईल, यामुळे राहायचे कुठे हा प्रश्न आहे. मुलगा साठ हजार रुपये घे आणि बाहेर हो, असे सांगतो, साहेब मी कुठे जाऊ, काय खाऊ, असे सांगताच येडगे यांनी तत्काळ करवीर प्रांताधिकार्यांना ज्येष्ठ नागरिक कायद्यान्वये या महिलेचा अर्ज दाखल करून घेण्यास सांगितले. यानंतर सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार विजय पवार यांनी श्रावणबाळ योजनेतून या महिलेला अनुदान सुरू करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली. यानंतर वृद्धा आभार मानून गावी परतली.