कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळली; मंत्र्याच्या मुलासह 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी

वैष्णवीच्या आत्महत्याप्रकरणात फरार सासरा आणि तिच्या दीराला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर, त्यांच्याकडून पोलीस तपासात त्यांना मदत करणाऱ्यांची नावे समोर आली.
पुणे : शहरातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi hagawane) आत्महत्याप्रकरणात पुणे पोलिसांनी राजेंद्र हगवणेसह कुटुंबातील 5 जणांना अटक केली आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हे फरार होते. अखेर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना मध्यरात्री बेड्या ठोकल्या. मात्र, 5 दिवस फरार असतानाही ते मटणावर ताव मारत होते, रिसॉर्टला राहत होते. त्यामुळे, दरम्यानच्या काळात आरोपींना आसरा देणाऱ्या मित्रांसह इतर 5 जणांना पुणे पोलिसांनी (Police) अटक केली होती. या सर्व आरोपींना आज कोर्टात (Court) हजर करण्यात आले होते. त्यावेळी, कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
वैष्णवीच्या आत्महत्याप्रकरणात फरार सासरा आणि तिच्या दीराला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर, त्यांच्याकडून पोलीस तपासात त्यांना मदत करणाऱ्यांची नावे समोर आली. त्यावरुन, आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या 5 जणांना पुणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्यावरील दाखल गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामध्ये, काँग्रेस नेते आणि माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील (कर्नाटक) यांचा मुलगा प्रीतम पाटील याचाही समावेश आहे.
वैष्णवीच्या अंगावर अनेक खुणा
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले असून आमच्या लेकीची हत्या करण्यात आल्याचे म्हटलं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी ही आत्महत्याच असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, शवविच्छदन अहवालानुसार वैष्णवीच्या शरिरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खूणा पाहायला मिळाल्या आहेत.