महाराष्ट्र

Yavatmal water Issue: दारातील नळ कोरडा, पाण्यासाठी वणवण करताना 12 वर्षांच्या वेदिकाचा डोहात बुडून मृत्यू, यवतमाळमधील विदारक घटना

Yavatmal water Issue: वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडपंपही चार महिन्यांपासून नादुरूस्त झाला असून तो बंदच आहे. त्यामुळे वस्तीतल्या महिला पुरूष लहान मुलांना जीव धोक्यात घालून दीड किलोमीटरची पायपीट करत अरूणावती नदीतून पाणी आणावं लागतं.

यवतमाळ : पाणी म्हणजे जीवन…मात्र, याच पाण्याच्या शोधात गेलेल्या पोटच्या लेकीला जिवानिशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वेदिका चव्हाण या बारा वर्षांच्या मुलीचा नदीत पाय घसरून पडून बुडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे वेदिकाच्या घरासमोर तसंच वस्तीतील प्रत्येक घराबाहेर एक वर्षांपासून सरकारची पाण्याची पाईपलाईन आली आहे. मात्र निगरगट्ट प्रशासन त्या पाईपलाईनला नळ लावून पाणीपुरवठा सुरू करू शकलेलं नाही. वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडपंपही चार महिन्यांपासून नादुरूस्त झाला असून तो बंदच आहे. त्यामुळे वस्तीतल्या महिला पुरूष लहान मुलांना जीव धोक्यात घालून दीड किलोमीटरची पायपीट करत अरूणावती नदीतून पाणी आणावं लागतं.

आजूबाजूच्या परिसरात पाण्याच्या शोधात अनेकांचे मृत्यू

अशातच पाणी घ्यायला गेल्यानंतर 12 वर्षीय वेदीकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. संतापजनक म्हणजे वेदिकाच्या मृत्यूनंतर प्रशासनाने नादुरूस्त हँडपंप झाकून ठेवला. वेदिकाच्या मृत्यूआधी पारधी बेड्यावर किंवा आजूबाजूच्या परिसरात पाण्याच्या शोधात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र प्रशासन एक दोन टँकर पाठवण्यासारख्या थातूरमातूर उपाययोजना करत मात्र पाण्याची कायमची सोय मात्र अद्याप केली नाही. आता वेदिकाच्या मृत्यूनंतर गावात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एबीपी माझाने या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला मात्र कोणीही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास तयार झालं नाही.

आमदार राजू तोडसाम यांनी सर्व जबाबदारी प्रशासनावर ढकलत काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन या परिसरातील गावांमधील आवश्यक पाणीपुरवठा संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. तरी काही झालं नाही असं म्हटलं आहे.

वेदिकाच्या आई वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, ती अनेक दिवसांपासून पाणी भरण्यासाठी नदीवर जात होती. गावातील पाण्याचे हँडपंप हे तीन चार महिन्यांपासून बंद आहेत. संपूर्ण गावाला पाण्याची समस्या आहे.वेदिका शाळेतून आली आणि मुलींसोबत पाणी आणण्यासाठी गेली होती. आम्ही आमची मुलगी गमावली पण दुसऱ्या कोणासोबत अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्याव आणि तातडीने पाण्याची सोय करावी अशी मागणी मृत वेदिकाच्या वडिलांनी रूपेश चव्हाण यांनी केली आहे.

लातूर जिल्ह्यातील पाणीबाणी 

आठ तांडा वस्तीवरील महिलांची पाण्यासाठी पायपीट. एकाच हातपंप भिस्त आणि त्यातही पाणी कमी, दोन घागरी पाण्यासाठी अनेक तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे, लातूर जिल्ह्यातील पाणीबाणी दिसून येत आहे. तांडा वस्तीवरील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू झाल्यात मात्र नियोजनाच्या अभावामुळे नळाला पाणी येत नाही. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांना हातपंपावर रात्रभर जागण्याची वेळ आली आहे.

तालुक्यातील नागलगाव आणि त्याच्या आजुबाजूला असलेली आठ तांडा वस्तीवरील महिलांची पाण्यासाठी मोठी धावपळ होत आहे. या भागात एकच हातपंप आहे.ज्याला पाणी येते. त्यासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. दिवसरात्र त्या ठिकाणी पाण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. नागलगाव आणि आठ तांडा वस्ती साठी 2 कोटी 60 लाखांची योजना मंजूर होऊनही हंडा भर पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरूच आहे. योजना मंजूर झाली. कामे ही झाले मात्र ही तांडे अद्याप तहानलेलीच आहेत. निकृष्ट कामामुळे पाणी त्यांच्या दारापर्यंत येत नाही. पिण्याचे पाणी विकत घेणे आणि सांडपाण्यासाठी हातपंप वरील रांगेत अनेक तास उभे राहण्याची वेळ आली आहे.

अशी विदारक स्थिती सोमला काशीराम तांडा, मारोती तांडा, राघोबा तांडा,रंगवाळ तांडा,बोरतळा तांडा,भीमा तांडा,टिकाराम तांडा,चवळे तांडा येथील ग्रामस्थांवर आली आहे. महिलांना यासाठी सर्वात जास्त कष्टाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा एकच स्तोत्र असल्यामुळे सगळी लोक त्यावरच अवलंबून आहेत. त्यात हातपंपचे पाणी कमी कमी होत आहे. पाण्याच्या टँकरची मागणी केली गेली आहे..मात्र त्याची अद्याप पूर्तता करण्यात आली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button