Pahalgam Terror Attack: नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली; मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली, कोणाला हस्तक्षेप करण्यास सांगितले?

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल (29 एप्रिल) लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसंच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिला. तसेच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय. दहशतवादाविरोधात आता आरपारची लढाई सुरू करण्याचा संकल्प मोदी सरकारने केल्याचं दिसतंय.
नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिल्याने पाकिस्तानची झोप उडाल्याचे दिसून आले. नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याने मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरारने मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी येत्या 24-36 तासांत भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार असल्याची माहिती असल्याचा दावा अत्ताउल्लाहने केला आहे.
पाकिस्तानचा मंत्री अत्ताउल्लाह तरार काय म्हणाला?
भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर भारतीय सैन्य हल्ला करू शकते. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ…, असं मंत्री अत्ताउल्लाह म्हणाला. पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे. त्यामुळे हे संकट आम्हाला समजते. आम्ही याचा कायम निषेध केला आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत असं सांगत मंत्री तरार यांनी जागतिक पातळीवर या स्थितीचं गांभीर्य ओळखून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे असंही पाकिस्तानी मंत्री अत्ताउल्लाहा तरारने म्हटलं आहे.
सीमापार लष्करी कारवाईवर आज शिक्कामोर्तब-
सीमापार लष्करी कारवाईवर आज राजधानीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज पहिली कॅबिनेट बैठक होतेय. त्याआधी आज दिल्लीत बैठकांचा अक्षरशः धडाका आहे. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक होणार आहे. त्यापाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ अर्थविषयक समितीचीही बैठक होणार आहे. या बैठकांनंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल. आज दिल्लीत होणाऱ्या या वेगवान हालचाली मोठ्या कारवाईच्या तयारीचे संकेत देतात. मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक झाल्यास सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनाची तयारी करत आहे असा अर्थ निघतो.