महाराष्ट्र

Nashik Satpir dargah violence: नाशिकच्या सातपीर दर्ग्याबाहेर रात्री 11 वाजता नेमकं काय घडलं? अचानक जमाव आला अन्….

Nashik Satpeer dargah violence: काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटविण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. गेल्या महिन्यात हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने आंदोलन ही करण्यात आले होते.

Nashik News: नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा मंगळवारी रात्री हटवण्यात आला आहे. पहाटे साडेपाच वाजता या दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ झाला असून आतापर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आता तोडकामानंतरचा बांधकामाचा राडारोडा वेगाने हटवला जात आहे. तत्पूर्वी काल रात्री दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ करण्यापूर्वी काही धार्मिक विधी पार पडले. यावेळी सातपीर दर्ग्याबाहेर मौलवी, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. उच्च न्यायालयाने सातपीर दर्गा हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मौलवी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी हा दर्गा हटवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, मंगळवारी रात्री एका जमावाने दगडफेक केल्याने याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या सगळ्या संदर्भात नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दर्ग्याचे ट्र्स्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी बांधकाम हटवण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री 11 वाजता हे सगळे जमले होते. त्याचवेळी उस्मानिया चौकाच्या बाजूने जमाव आला आणि गोंधळ सुरु झाला. दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही जमावातील लोकांना समजावले. मात्र, त्यांनी कोणाचेही न ऐकता दगडफेक सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधूर आणि सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. याप्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. जमावाच्या दगडफेकीत 31 पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. जमावातील संशयित हल्लेखोरांच्या 57 बाईक्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत, अशी माहिती किरण कुमार चव्हाण यांनी दिली.

काठे गल्ली परिसरातील परिस्थिती नियंत्रणात

कालच्या दगडफेकीच्या प्रकारानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून पहाटे साडेपाच वाजता सातपीर दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ केला. दोन जेसीबींच्या सहाय्याने दर्ग्याच्या भिंती आणि अन्य बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. आतापर्यंत अनधिकृत दर्ग्याचे 90 टक्के बांधकाम पाडण्यात  आले आहे. या पाडण्यात आलेल्या बांधकामाचा राडारोडा पालिकेकडून वेगाने हटवला जात आहे. अतिक्रमणाचा मलबा आणि साहित्य महापालिकेच्या वाहनांतून आता बाहेर काढण्यात आले. सध्या काठे गल्ली परिसरातील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर काठे गल्ली ते भाभा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेने 15 दिवसांत सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र, हे बांधकाम हटवण्यात न आल्याने पालिकेकडून सातपीर दर्गा जमीनदोस्त करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button