Pandit Patil : मोदी अन् फडणवीस म्हणजे मुख्य नदी, गंगेत गेलेलं बरं; भाजपमध्ये प्रवेश करताच पंडित पाटील काय-काय म्हणाले?

नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस ही मुख्य नदी आहे, म्हणून मी भाजपात आलो. भाजप काम करणार्या लोकांना संधी देतो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया पंडित पाटील यांनी दिलीय.
SKP Pandit Patil to Join BJP मुंबई : नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस ही मुख्य नदी आहे, म्हणून मी भाजपात आलो. भाजप काम करणार्या लोकांना संधी देतो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निर्णय घेतला असल्याची पहिली प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) माजी आमदार आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील (Jayant Patil) यांचे बंधू पंडित पाटील (Pandit Patil) यांनी दिली आहे. माजी आमदार पंडित पाटील यांनी आज (16 एप्रिल) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वात आज त्यांनी आपला पक्ष प्रवेश केलाय. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात आज त्यांनी आपला पक्षप्रवेश करताना तूफान फटके बाजी केलीय.
भाजपमध्ये प्रवेश करताच पंडित पाटील काय-काय म्हणाले?
या वेळी बोलताना माजी आमदार पंडित पाटील म्हणाले की, मला भांडण करायची गरज नाही. जिल्हा बँक संचालक, जिल्हा परिषद सदस्य, सगळे आज आले आहेत. पंडीत शेट भाजपात येणे शक्य नव्हते. पण मी धारप साहेब आणि चव्हाण साहेब यांना शब्द दिला होता. शेकापच्या माध्यमातून आम्ही खासदार केले. आमच्या शिडीने अनेक लोक वर गेले पण कार्यकर्ता संपला. गेल्या निवडणुकीत आम्ही तटकरेंना खासदार केले, आघाडी मार्फत खासदार झाले, पण आम्हाला ते विसरले. मला अभिमान आहे, भाजप नेते रविंद्र चव्हाण यांना भविष्यात काय पद मिळेल, पण त्यांनी सांगितले की तुम्ही भाजपात या, तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल. मी शब्द देतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असेल. असा विश्वास ही पंडित पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला.
उपनद्यात जाण्यापेक्षा मुख्य नदीत गेलेलं बरं,म्हणून मी भाजपात आलो- पंडित पाटील
डाव्या आघाडीतील मी नेता होतो, अनेक वर्ष काम केलं. आघाडीच्या घटकपक्षांनी आम्हाला साईडलाइन केलं. लोकांना प्रश्न पडला असेल, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्ष प्रवेश होणार आहे, मात्र भाजपात काही नियम आहे. आम्हाला भव्यदिव्य कार्यक्रम करायचा होता. मी आधी स्वतंत्र माणूस होतो, मात्र आता मला देखील प्रोटोकॉलनं वागावं लागेल. एक विरोधी पक्षात राहात श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही. मला अनेकांनी ऑफर दिली होती मात्र गंगेत गेलेलं बरं. उपनद्यात जाण्यापेक्षा मुख्य नदीत गेलेलं बरं, बाकी पण इकडेच येऊन जुळणार आहे आहे. नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस ही मुख्य नदी आहे.म्हणून मी भाजपात आलो असेही पंडित पाटील म्हणाले.
मी कोल्हाटी उड्या मारणार नाही, ही फक्त झांकी आहे- पंडित पाटील
पंडीत शेठ हा प्रवाहाविरुद्ध जाणारा कार्यकर्ता आहे. मी आज प्रवाहासोबत जात आहे. मी जिल्हा परिषद सदस्य होतो, आमदार होतो. पंडीत शेट काय वस्तू आहे हे चव्हाण यांना माहिती आहे. माझा भाऊ धैर्यशील पाटील हा जिल्हा अध्यक्ष आहे, ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, व्यक्तीवर आधारित नाही. शेवटपर्यंत मी इथेच राहील, रोज रोज कोल्हाटी उड्या मारणार नाही, ही फक्त झांकी आहे. दोन महिन्यात बरेच पक्ष प्रवेश पाहायला मिळतील. मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने भाजपात यावे, पंडीत शेट थांबणारी व्यक्ती नाही, मी गद्दारी केली नाही. विचारविनिमय करून निर्णय घेतला. माझ्या सुनेचा अपघात झाला होता, म्हणून विलंब झाला. पण आता सगळं शांत झालं आहे, चांगला दिवस आहे. गरज सरो आणि वैद्य मरो होता कामा नये, असे म्हणत पंडित शेट पाटील यांनी यावेळी तुफान फटकेबाजी केली.