काँग्रेस नेत्यांनी निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, पण आता विशाल पाटलांच्या भूमिकेने भूवया उंचावल्या

Vishal Patil big statement : भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, मलाही मंत्रिपद मिळेल, अपक्ष खासदार विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य
Vishal Patil big statement :“जयकुमार गोरे प्रथम अपक्ष आमदार झाले आणि मी प्रथमच अपक्ष खासदार झालो…मला ही मंत्रिपद मिळेल; भविष्यात मी काँग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन”, असं वक्तव्य सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केलंय. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने सांगलीत डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते. सांगलीमधील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये हे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे,संजय भोकरे यांची उपस्थिती होती.
विशाल पाटील म्हणाले, मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे सांगलीचे जावई आहेत.आमच्या शेजारी गोरेची सासरवाडी आहे. गोरे पण प्रथम अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले, मी पण आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय. भविष्यात मी काँग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल, अशी आशा आहे. आम्ही पण पुढे जावे अशी आशा आहे, असे खासदार विशाल पाटील म्हणालेत.
लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा राज्यभर रंगली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनीच या निवडणुकीत आघाडी धर्म पाळला नाही, अशी चर्चा होती. लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगलीच्या सभेत विश्वजीत कदम यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला होता. स्टेजवर एक आणि खाली एक भूमिका घेणे, योग्य नाही, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते. सांगलीच्या (Sangli Loksabha) जागेवरुन विश्वजीत कदम आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती.