आता गरिबाचा घास नाही… सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार

गुढी पाडव्यापासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दर 93 हजार 500 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 1 लाख 2 हजारांवर गेला आहे
पुणे : गेल्या वर्षभरात सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून गेल्याच महिन्यात सोनं (Gold) 90 हजारांच्या पार गेल्याचं बाजारात पाहायला मिळत आहे. एकीकडे सोन्याची वाढती किंमत पाहून सोनं आता गरिबाचा घास राहिला नाही, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहे. कारण, सोन्याचा आजचा दर तब्बल 93 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचला आहे. त्यातच, पुढील काही दिवसांत सोनं लाख मोलाचं होणार असल्याचे पुण्यातील (Pune) सोनं विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
गुढी पाडव्यापासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दर 93 हजार 500 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 1 लाख 2 हजारांवर गेला आहे. जागतिक स्तरावर झालेली अनिश्चितता हे सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या काही धोरणांचा थेट सोन्याच्या दरावर परिणाम पडत आहे. सोन्याचे दर वाढत असले तरी देखील सोन्याकडे एक शाश्वत गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघितलं जाते. परिणामी ग्राहकांकडून सोन्याची विक्री कुठेही कमी झालेली नाही. मात्र, सर्वसामान्यांकडून वाढत्या सोन्याच्या दरवाढीवर चिंताजनक प्रतिक्रिया येत आहेत.
मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी किंवा एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं खरेदी ही सातत्याने केली जाते. विशेष म्हणजे गरीब घरचा माणूसही मनी-मंगळसूत्र घ्यायचं म्हणून तरी सोनं खरेदी करतोच. मात्र, हेच सोनं आता गरिबाचा घास राहिला नाही, असे बोललं जात आहे. आता या सोन्याची किंमत 1 लाख रुपये प्रति तोळा जाईल का यावर पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय धोरण आणि मार्केट परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील काही महिन्यात सोन्याचा दर 1 लाख रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतो.
हॉलमार्कशिवाय सोनं विक्री, नंदूरबारमध्ये दुकानांवर कारवाई
सोनं खरेदी करताना अनेकदा ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे, सरकारने सोनं खरेदी करताना हॉलमार्क असल्याशिवाय सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, तरीही सोन्याची विक्री हॉलमार्कशिवाय केली जाते. नंदूरबारमध्ये हॉलमार्कशिवाय सोनं विक्री करणाऱ्या सराफा दुकानांवर बीआयएसच्या पथकाकडून छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात 900 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं असून सहाय्यक संचालक कुंजन कुमार आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. जिल्ह्यातील 3 दुकानांमध्ये विना हॉलमार्क सोने विक्री होत असल्याचे आढळून आलं आहे. त्यामुळे, हॉलमार्कशिवाय सोनं विक्री करणाऱ्या सराफा दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे.