American Share Market : टॅरिफला स्थगिती दिली, चीनवर 145 टक्के टॅरिफ लागणार, इतकं करुनही अमेरिकेचा शेअर बाजार गडगडला…

US Markets Fall : अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा फटका अमेरिकेला देखील बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक निर्णयांचे पडसाद संपूर्ण जगभर पाहायला मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी टॅरिफ लादतात, कधी टॅरिफ वाढवतात तर कधी स्थगिती देतात. यामुळं शेअर बाजारातील अस्थिरता वाढते, त्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या आर्थिक नुकसानीत होतो. गेल्या दहा दिवसांमध्ये जगभरातील शेअर बाजारांना मोठा फटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील टॅरिफ 125 टक्के करण्याचं जाहीर करताना ज्या देशांनी व्यापारी करारासाठी चर्चा सुरु केली त्यांच्यावरिल टॅरिफला स्थगिती देण्याची घोषणा केली. याचा सकारात्मक परिणाम अमेरिकेच्या शेअर बाजारात दिसणं अपेक्षित होतं. मात्र, तसं दिसून आलेलं नाही. एका दिवसाच्या तेजीनंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
अमेरिकन शेअर बाजारात (गुरुवारी) सर्व निर्देशांकामध्ये घसरण झाली. डॉव जोन्स इंटस्ट्रियल एवरेजमध्ये 1571 अंक म्हणजेच 3.9 टक्के घसरण झाली. डाऊ फीचर्समध्ये 1621 अंकांची म्हणजेच 3.98 टक्के घसरण होऊन तो 39078 अंकांवर पोहोचला. नॅस्डॅक कम्पोझिट हा निर्देशांक जवळपास 5.02 टक्के म्हणजेच 860.8 अंकांनी घसरला. एस अँड पी 500 निर्देशांक जवळपास 236.36 अंकांनी म्हणजेच 4.31 टक्क्यांनी घसरुन खाली आला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोडून इतर देशांना रेसिप्रोकल टॅक्समधून 90 दिवसांसाठी दिलासा दिला आहे. त्यानंतर अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यामध्ये घसरण झाली. सीएनबीसीनुसार बुधवारी एस अँड पी 500 निर्देशांक 9 टक्क्यांनी वाढला होता. डॉव जोन्स मध्ये 2020 नंतर सर्वात मोठी वाढ झाली होती. तर, नॅस्डॅकमध्ये 2001 नंतर एका दिवसातील सर्वाधिक वाढ झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी 9 एप्रिलला चीन वगळता इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्याच्या काळात या देशांवर 10 टक्के रेसिप्रोकल टॅरिफ लागू असेल.चीननं देखील अमेरिकेच्या टॅरिफ वॉरपुढं झुकणार नसल्याचं म्हटलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 125 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फँटेनाईल क्रायसिससाठी लादण्यात आलेल्या 20 टक्क्यांचा देखील समावेश आहे. त्यानुसार अमेरिकेनं एकूण चीनवर 145 टक्के टॅरिफ लादलं जाणार आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर यूरोपियनं यूनियननं देखील अमेरिकेवर लादलेल्या टॅरिफला स्थगिती देत असल्यां म्हटलं. एकीकडे शेअर बाजार कोसळलेले असताना सोन्याच्या दरात वाढीचा ट्रेंड सुरु आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद विविध घटकांवर दिसून येत आहे. दुसरीकडे क्रूड आईलच्या दरात देखील घसरण सुरु आहे.