Akshay Munde : घरात अठराविश्व दारिद्र्य, क्लासला पैसे नव्हते, तरीही बीडच्या अक्षय मुंडेंने युपीएससी परीक्षा क्रॅक कशी केली? म्हणाला..

Akshay Munde : घरात हलाकीची परिस्थिती असताना कोचिंगसाठी पैसे नव्हते म्हणून स्वतःच अभ्यास करावा लागला. यामुळे मला यासाठी सहा वर्ष लागले.आईची मेहनत होती आणि बहिणीचा आशीर्वाद होता, असंही त्यांनी म्हटलं.
बीड: “आई इंदुबाई मुंडे यांनी शेतात राबत कष्ट करत माझ्या शिक्षणाकडं लक्ष दिलं. आई आजही शेतात काम करते. स्वतः निरक्षर असली तरी तिने मला घडवलं आहे. माझ्या यशामागे तिचा मोलाचा वाटा आहे. मी परिक्षेत यशस्वी झालो आणि आईचा चेहरा आनंदाने फुलला, हेच माझं खरं यश आहे,” अशी प्रतिक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवलेल्या पांगरी (गोपीनाथ गड) येथील डॉ. अक्षय संभाजीराव मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. अक्षय यांच्या यशात त्यांच्या आईसोबतच बहिणीचा, अक्षता हिचाही मोठा वाटा आहे, असे ते अभिमानाने सांगतात.
बीड येथील पांगरी (गोपीनाथ गड) परिसरीतील रहिवासी असलेल्या अक्षयचे शिक्षण स्थानिक संत भगवान बाबा विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावी झाले. पुढे अकरावी-बारावी परळी येथील न्यू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये, तर बीडीएसचे शिक्षण लातूरमधील एमआयटी कॉलेजमध्ये घेतले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्याने पुण्यात काही काळ क्लास लावले आणि नंतर थेट नवी दिल्ली गाठून तयारी सुरू ठेवली. अखेर अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी UPSC परीक्षेत देशभरातून 699 वा क्रमांक मिळवत यश संपादन केलं. अक्षय मुंडे यांनी सहाव्या प्रयत्नात ही यश मिळवले आहे.अक्षय यांच्या यशात त्यांच्या आईसोबतच बहिणीचा, अक्षता हिचाही मोठा वाटा आहे, असे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या या यशामुळे पांगरी गावासह परळी तालुक्यातील अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण असून, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामध्ये परळी तालुक्यातील पांगरीचा अक्षय मुंडे यांनी 699 रॅक मिळवला. त्याचे मूळ गाव असलेल्या पांगरीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्याच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण देखील करण्यात आली. आधी अक्षयच्या आईने औक्षण केले. त्यानंतर अक्षय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन देखील घेतले.
घरात हलाकीची परिस्थिती असताना कोचिंगसाठी पैसे नव्हते म्हणून स्वतःच अभ्यास करावा लागला. यामुळे मला यासाठी सहा वर्ष लागले.आईची मेहनत होती आणि बहिणीचा आशीर्वाद होता, कोणीही सोबत नसलं तरी शेवटी देव आहे असं स्वतःला सांगत होतो. प्रयत्न करत राहा यश मिळेल. बारावीपर्यंत शिक्षण परळी तालुक्यात झालं. त्यानंतर बीडीएस केलं. आईने व्याजाने पैसे घेऊन मला शिकवलं. माझ्या नावावर कर्ज देखील आहे. पुण्यामध्ये कोचिंगसाठी ऍडमिशन घेतले होते. मात्र पैसे नसल्यामुळे त्यांनी मला तिथे येऊ दिलं नाही. कुणाला बघून यूपीएससी करू नका. जोपर्यंत मनापासून येत नाही. प्रोसेस समजून घ्या. हे समजून घेतल्यास तुम्हाला कोचिंगची देखील गरज नाही, खचून जाऊ नका. नेहमी पॉझिटिव्ह रहा. तुकाराम मुंढे, किरण कुमार गित्ते, हे माझ्यासाठी इन्स्पिरेशन होते. माझ्या यशाचे श्रेय मी आई-बहीण आणि स्वामी समर्थांना देतो असेही अक्षय मुंडे म्हणाले आहेत.