Ajit Pawar in Beed: मिटींग सुरु झाल्यावर हे माहिती नाही, ते माहिती नाही खपवून घेणार नाही, मला अप टू डेट माहिती हवेय; अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. काहीवेळापूर्वीच अजित पवार हे हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात दाखल झाले. अजित पवार (Ajit Pawar) आज जिल्हा प्रशासकीय बैठकीसाठी बीडच्या (Beed News) दौऱ्यावर आले आहेत. दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांनी सगळी माहिती तयार ठेवावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरमधून उतरताच पोलीस अधीक्षक, सीईओ आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना सूचना केल्या आहेत. बीडमधील विमानतळ, रेल्वे लाईन, घरकुल याबाबतची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. दुपारपासून मिटिंग सुरु होतील. मी सुरुवात केल्यावर मग याची माहिती नाही, त्याची माहिती नाही, असं चालणार नाही. आता मला काय माहिती हवी आहे, ते तुम्हाला सांगितलं जाईल. विमानतळ, रेल्वे लाईन, राष्ट्रीय महामार्ग असे बरेच मुद्दे काढले आहेत. आता साडेआठ वाजले आहेत, पुढच्या चार तासांमध्ये मला सगळी अप टू डेट माहिती हवी आहे. डिसेंबरपर्यंत आपल्याला सगळं मार्गी लावायचं आहे. शेवटच्या क्षणाला सगळं चालणार नाही. डिसेंबरपर्यंत क्वालिटीची कामं होतात की नाही बघणार, असे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आपल्या पुढच्या दौऱ्याला निघून गेले. संध्याकाळी साडेपाच वाजता अजित पवार हे बीडमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्यासह हजर राहणार आहेत. त्यापूर्वी बैठकांमध्ये काय घडते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अजित पवारांच्या दौऱ्यासाठी बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त
उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बीडच्या दौऱ्यावर असतील. त्यांच्या या दौऱ्यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात अजित पवार बैठकांना उपस्थित राहणार असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे. याबरोबरच पक्ष पदाधिकाऱ्यांकडून देखील जोरदार तयारी करण्यात आली असून शहराच्या विविध भागात मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुलाबी रंगाची थीम कायमच ठेवली असल्याचे या बॅनर्समधून दिसत आहे.
धनंजय मुंडे यांची गैरहजेरी
अजित पवार गेल्यावेळी बीडच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. मात्र, संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडशी जवळीक असल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्यापासून अंतर राखून आहेत. त्यामुळेच धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या बीडमधील दौऱ्याला गैरहजर असल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. माननीय अजित पवारांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबईला यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.