Eknath Shinde : भोळा आणि भानगडी सोळा; कोल्हापूरचा कोणता नेता एकनाथ शिंदेंच्या रडारवर?
बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 100 वेळा विचार करा, पण दिलेला शब्द बदलू नका. बाळासाहेब यांचे विचार बदलले त्यांना धडा शिकवण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले.
कोल्हापूर: मी कुणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर सोडत नाही. आम्ही काही लपून छपून करत नाही, खुलेआम करतो असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला. काही नेते दिसायला साधे असतात. दिसायला भोळा आणि भानगडी सोळा असे काही नेते कोल्हापुरात आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. आता हा टोला एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील कोणत्या नेत्याला उद्देशून लगावला याची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या आभार यात्रेमध्ये बोलत होते. या कार्यक्रमावेळी त्यांनी कोल्हापूरकरांचे आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर याचे कौतुक केले. मी मुद्दाम आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना केलं. कारण या विभागात लोकांची सेवा करायची संधी मिळते. राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आपला प्रकाश आरोग्याचं काम करतोय असं एकनाथ शिंदे म्हणाले.
कोल्हापूरकरांनी विरोधकांना थ्रो करून टाकलं
एकनाथ शिंदे म्हणाले की, “कोल्हापूर आणि शिवसेनेचे नातं वेगळे आहे. बाळासाहेब नेहमी कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करायचे. पण बाळासाहेब यांच्या विचारांचा गळा घोटाणाऱ्याबद्दल काय बोलावं? कोल्हापूरकरांनी ‘एक ही मारा लेकीन सॉलिड मारा’. बाळासाहेब यांचे विचार बदलले त्यांना धडा शिकवण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं. कोल्हापूरकरांनी यूज अॅण्ड थ्रो करणाऱ्यांना थ्रो करून टाकलं. कोल्हापूरच्या महापुरात मुंबईत बसून धंदे करत होते, त्यावेळी महापुरात हा एकनाथ शिंदे आला होता.”
इथं खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी
एकनाथ शिंदे म्हणाले की, “लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो तुमचे आभार मानतो. व्यासपीठ आमचं मजबूत आहे आणि समोर बसलेलं आमचं वैभव आहे. निवडणुकीत मी वचन दिलं होतं. म्हणून आभार मानायला आलो. अडीच वर्षात तुमचा एकनाथ शिंदे 22 तास काम करत पायाला भिंगरी बांधून फिरला. काम केलं निर्विवाद म्हणून जनतेनं दिलं भरभरून आशीर्वाद. आमचं ठरलं म्हणत कोल्हापूरच्या जनतेनं 10 पैकी 10 आमदार दिले. इथं खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी केलं, टांगा पलटी घोडे फरार. तुम्ही प्रकाशला आमदार केलं, मी त्यांना नामदार केलं, पालकमंत्री केलं. कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही, जाळ आणि धूर संघटच निघतो.”
सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आणणार
एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही तर दारात उभारून काम करणारा असतो. विरोधकांनी लोकसभेला फेक नेरेटिव्ह तयार करून थोडं यश मिळवलं. विधानसभेला हॉटेल बुक करू ठेवले होते. पण जनतेनं त्यांना दाखवून दिलं. ज्यांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला त्यांना जनतेनं कोल्हापुरी जोडा दाखवला. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार? आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नसलो तरी जनतेच्या जीवनात सोन्याचा दिवस आणण्यासाठी जन्माला आलो. आम्ही लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन थांबणार नाही.”
एकनाथ शिंदे म्हणाले की, “श्री बाळूमामा मंदिराचा तीर्थक्षेत्राच्या विकासाचा आराखडा होतोय. हे पुरोगामी राज्य आहे, विकासाचं राज्य आहे. या राज्याला आर्थिक बळ मिळत जाईल तसं राज्यातील योजना अंमलात आणू. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 100 वेळा विचार करा, पण दिलेला शब्द बदलू नका.”