महाराष्ट्र

‘महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण….’, राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद

Uddhav Thackeray:   मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय.

Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजुला ठेवायला तयार असल्याचे विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंच्या आवाहनला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी इच्छा दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार व्यक्त केली होती. पण लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान ते शक्य झाले नाही. पण निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला. यानंतर आता ठाकरे बंधु एकत्र येणार का? या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका 

विधानसभेतील जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाही. थापांमुळे त्यांना लोकांनी मतदान केलं. शेतकऱ्यांना हमीभाव, 2 कोटी लोकांना रोजगार, कर्जमुक्ती या मुद्द्यांवर त्यांनी मत मिळवली. एवढं फसवून पण मी पुन्हा येईन असं का? असा टोला त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारला लगावलाय.

राज ठाकरेंच्या प्रतिसादावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला चाललेयत. याबद्दल आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी आवाज उठवला. तेव्हाच विरोध का केला नाही?. तेव्हा बिनशर्थ पाठींबा देऊन तडजोड केली गेली. असे चालणार नाही. भांडण माझ्याकडून नव्हती. मी भांडण मिटवून टाकली. माझ्याबरोबर की भाजपबरोबर जायचं हे मराठी माणसांनी ठरवा. गद्दार सेना चालणार नाही. महाराष्ट्र हितासाठी मी किरकोळ भांडणं विसरायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. एकदा एकत्र आल्यानंतर भेटाभेटीचे कार्यक्रम चालणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे? 

आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे असं सांगत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्तावच दिला आहे. दिग्दर्शक-निर्माता महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे विधान केलं आहे.  उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येऊ शकता का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही”. पुढे ते म्हणाले “पण विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. आपण महाराष्ट्राचं मोठं चित्र पाहण्याची गरज आहे, ते मी पाहतोच आहे. माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांतील मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button