महाराष्ट्र

एकनाथ शिंदे पुन्हा अमित शाह यांना भेटले, शाह म्हणाले “तुमचं महायुतीसाठीचं…”

“राज्यात लवकरच सर्व काही ठीक होईल. महायुतीसाठी तुम्ही जे काही त्याग आणि योगदान दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही,” असे आश्वासन अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती समोर येत आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात आज सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास तासभर चर्चा झाली. या बैठकीत राज्याच्या वित्त विभागाच्या निधी वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना महत्त्वपूर्ण आश्वासन दिले.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा कायम पाहायला मिळते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून निधी मिळत नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच फाईली अडवून ठेवण्यात येत असल्याची तक्रारही प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यातच एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शाहांची भेट घेऊन उघडपणे नाराजी व्यक्त केली. शिवसेना आमदारांना निधी वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याची तक्रारही त्यांनी केल्याचे समजते.

महायुतीसाठी तुम्ही दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही

आता यावरुनच अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीसाठी तुम्ही जे योगदान दिले, त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

“राज्यात लवकरच सर्व काही ठीक होईल. महायुतीसाठी तुम्ही जे काही त्याग आणि योगदान दिले आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही,” असे आश्वासन अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र निधी वाटपाच्या सकारात्मक चर्चेमुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंनी अमित शाहांवर उधळली स्तुतीसुमने

देशाचे गृहमंत्री अमित शाहांवर एकनाथ शिंदेंनी स्तुतीसुमने उधळली. मोदी सरकारने कलम 370 हटवले, वक्फ बोर्डाच्या विधेयकावेळी केलेलं भाषण अंगावर शहारे आणणारे होते. सीमेवरील शत्रू बिळात बसले आहेत, कारण अमित शाह आणि मोदीजींमुळे, देशामध्ये हिंसा पसरवणारे लोक, दहशतवादी असतील अतिरेकी असतील त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम त्याचबरोबर 26/11 चा मास्टरमाईंड राणाला दिल्लीत मुंबईत आणलं जाईल आणि फासावर चढवलं जाईल. ही कामगारी आपल्या प्रधानमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button