महाराष्ट्र

Virar : शिक्षिकेच्या घरात 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, विरारमध्ये प्राचार्यांवर गुन्हा दाखल

Virar HSC Exam Case : परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षित पद्धतीने शाळेतच तपासण्याचे निर्देश असतात. त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या असा प्रश्न विचारण्यात येतोय.

पालघर : बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी विरारमधील प्राचार्य आणि शिक्षकांवर बोळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी नसतानाही बेकायदेशीररित्या या उत्तरपत्रिका घरी नेण्यात आल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या होत्या.

विरार मध्ये 12 वी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. विरारच्या नानाभात या परिसरात राहणाऱ्या प्रिया रोड्रिंक्स या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली. उत्तर पत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत बोळींज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जळालेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.

175 उत्तरपत्रिका जळाल्या

बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या एकूण 300 उत्तरपत्रिका शिक्षिकेने तपासणीसाठी घरी नेल्या होत्या. घरात अचानक आग लागली आणि या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला. त्यामध्ये 175 उत्तरपत्रिका जळाल्या. ही घटना 10 मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोळींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली होती.

या प्रकरणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाच्या विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शासनाचा प्रतिनिधी म्हणून जोत्स्ना शिंदे यांनी तक्रार केली. त्यांच्यासोबत ज्योत्स्ना शिंदे यांच्या सोबत पालघरच्या माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षण अधिकारी संगिता भागवत याही सोबत होत्या. ज्या शिक्षकाच्या घरी बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या, त्या शिक्षिकेलाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्षिकेवर योग्य ती कारवाई व्हावी

बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे बंधनकारक असताना त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी कशा नेल्या? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार, परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षित पद्धतीने शाळेतच तपासण्याचे निर्देश असतात. त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या असा प्रश्न विचारण्यात येतोय. उत्तरपत्रिका जळल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही

जळालेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करून त्याचे गुणदान झाले असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. कारण गुणदान केलेला कागद सुरक्षित आहे अशी माहिती आहे. आत्पकालीन परिस्थिती आल्यास उत्तरपत्रिका नष्ट झाली असल्यास इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून संबंधित विषयाचे गुण देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button