फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादी पार पडला मेळावा.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad pawar) पक्षाकडून पक्षातील फुटीच्या चर्चेला छेद देण्याचा आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आजच्या सांगलीतील मेळाव्यातून झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार सांगलीत पार पडलेल्या पहिल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाकडून रिचार्ज करण्यात आले. तसेच, राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या निमित्ताने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाना देखील पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले. येथील मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी महत्वाची घोषणाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी केली आहे. सांगलीतून ज्याची सुरुवात होईल ती गुढी भविष्यात राज्यात उभारली जाईल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी आता फोनवरुन हॅलोऐवजी जय शिवराय बोलायचं, असे म्हटले. आता येथून पुढे फोन लावल्यावर जय शिवराय बोलायचं, सुरुवात सांगलीतून होईल हा प्रांताध्यक्षांचा आदेश आहे, असेही शिंदे यांनी म्हटले.
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादी पार पडला मेळावा. या मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. कोणताही फोन आला तर सुरुवातीला जय शिवराय म्हणायचं, सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला आपण शाबूत ठेवला. परंतु, दुर्दैवाने सातारामधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाभूत झाला आहे. गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले, त्यांनी हार मानली नाहीत. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असे आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने व्यवस्थित पेरणी केली. त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. आता आपल्याला पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे लागणार आहे. एकीकडे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याच्या घोषणा केल्या जातात आणि दुसरीकडे मात्र धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी काळात तालुकास्तरावर मेळावे घेतले जातील. जो कार्यकर्ता सक्षम आहे, त्याच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यात येईल. तसेच जो पक्षात येण्यास इच्छुक आहे, त्याला देखील जबाबदारी देण्याचा विचार होईल, असेही शिंदे यांनी म्हटले. हल्ली तरुणांना भावनिकतेच्या मुद्द्यावर दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदांच्या जागेवर स्थानिक तरुणांचा हक्क असल्याचं जाणून दिलं पाहिजे. सरकार शासकीय कार्यालयामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी आता आंदोलन उभारण्याची गरज आहे. जिल्ह्यातील शंभर कार्यकर्त्यांची फौज अशी तयार ठेवा की राज्यात कोणताही मुद्दा उपस्थित झाला तर त्याची सुरुवात आंदोलनातून, सांगलीतून झाली पाहिजे. ज्या योजना बंद होत आहेत, त्या योजनेचे लाभार्थी शोधा व त्यांना सरकार अन्याय कसं करत आहे हे पटवून द्या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
मग, पुन्हा निवडणूक होतील की नाही
राजकीय पाठबळ असल्याशिवाय खोके बोके कुणीही पुढे येत नाहीत, असे म्हणत बीड्या घटनेवर शिंदे यांनी भाष्य केलं. तसेच, मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दिलेल्या निर्णयारही त्यांनी भाष्य केलं. मी न्यायालयाच्या विरोधात बोलत नाही. पण कोर्ट म्हणत असेल, खर्च वाढेल म्हणून निवडणुका परत नको आणि अशा पद्धतीने निकाल देत असतील तर राज्यात पुन्हा निवडणुका होतील की नाही, याबाबत शंका असल्याचे शिंदे यांनी म्हटले.