महाराष्ट्र

Satish Wagh Murder Case: आमदार टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या खुनापूर्वी जादूटोणा अन् रेकी; सुपारीचे पैसेही अक्षयने दिले, महिला मांत्रिकाकडून…, दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर

Satish Wagh Murder Case: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खुनापूर्वी जादूटोणा अन् रेकी केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे, त्यामध्ये माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार हा अक्षय जावळकर, तर त्याला भरीस घालणारी वाघ यांची पत्नी मोहिनी असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यांनी सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे. लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहे. अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे.

सतीश वाघ यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपहरण करून पंधरा मिनिटांतच तब्बल 72 वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. सतीश यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता हा तपास पुढे हडपसर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर हे दोघे 2013 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. अक्षय हा त्यांच्याकडे भाड्याने राहत होता. पुढे मोहिनी यांच्या मुलाला एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळून देण्याच्या कारणातून दोघे आणखी जास्त संपर्कात आले. 2013 ते 2017 पर्यंत अक्षय हा मोहिनी हिच्याच घरी झोपायला असायचा. मात्र, 2017 मध्ये सतीश यांना आपली पत्नी मोहिनी आणि अक्षय या दोघांबाबत संशय आला. तेव्हापासून अक्षय याने मोहिनीचे घर सोडले. पुढे तो दुसरीकडे राहण्यास गेला. मात्र, त्यांच्यातील अनैतिक संबंध सुरूच होते. मोहिनी पती सतीश यांच्या त्रासाला वैतागली होती. घरातील दहा रुपये देखील खर्च करण्याचा अधिकार मोहिनीला नव्हता. त्यामुळे काही करून सतीश यांचा काटा काढण्याचे मोहिनी अक्षय याला सांगत होती. अक्षय आणि मोहिनी या दोघांनी विचार पक्का केल्यानंतर त्यांनी सतीश यांचा काटा काढण्याची योजना आखली.

जवळजवळ एका वर्षापासून वाघ यांना संपवण्यासाठी नियोजन

सतीश यांना संपवण्यासाठी जवळपास एका वर्षापासून त्यांची पत्नी मोहिनी आणि तिचा प्रियकर अक्षय जवळकर हे दोघे नियोजन करत होते.सतीश वाघ यांना संशय आल्याने ते दोघे घरात भेटता येत नसल्यामुळे एका लॉजवर भेटत असत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश यांचा खून करण्यापूर्वी मोहिनी हिने एका मांत्रिक महिलेची देखील वाघ यांना आपल्या वाटेतून बाजूला करण्यासाठी मदत घेतली असल्याची माहिती आहे. अक्षय याने सतीश यांच्या खुनाची सुपारी पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे या तिघांना दिली होती. त्यानुसार या तिघांनी वाघ यांची तब्बल तीन वेळा रेकी केली. सुरुवातीला दुचाकीवरून येऊन ठार मारण्याचे नियोजन केले. परंतु, परिसरातील गर्दी पाहता हे त्यांना शक्य झाले नाही. त्यानंतर लक्ष ठेवून संधी मिळाल्यानंतर त्यांचं अपहरण केलं आणि त्यांच्यावर चारचाकी गाडीमध्ये वार करून त्यांचा जीव घेतला त्यांनंतर त्यांना शिंदवणे घाटातील निर्जन स्थळी फेकून दिलं.

सुपारीतील एकही रुपया मोहिनीने दिला नाही

सतीश वाघ यांची सुपारी पाच लाख रुपयांना देण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सुपारीतील एकही रुपया मोहिनीने दिला नसल्याची माहिती आहे.अक्षय जवळकरने आपल्याकडील दीड लाख रुपये सुरुवातीला अ‍ॅडव्हान्स म्हणून शर्माच्या बँक खात्यावर पाठवले होते. त्यानंतर शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी सतीश वाघ यांचा खून केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अक्षयने राहिलेले तीन लाख रुपये शर्माला त्याच्या वाघोली येथील घरी नेऊन दिले होते अशी माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button