20 टाळकी मुख्यमंत्री काय करणार, ब्रह्मदेव आला तरी हे सरकार पडणार नाही : अजित पवार

तुम्हीही काही काळ सत्तेत होता, तुमचे श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती नाही. चांगल्याला चांगले म्हणण्याचा माझा स्वभाव आहे.
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अर्थंसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होत असताना सभागृहात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हे मला भाषणातून मारत होते, पण मी गप बिचारा ऐकत होतो. मी गरीब असल्याने इकडे बसलोय, असे म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. मग आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्माननीय सदस्यांनी ठरवायचे आहे की, मागील पाच वर्षात राज्याने प्रगती केली की, आपलं राज्य मागे गेले? आमचे तरी म्हणणे आहे की, राज्य मागील पाच वर्षात पुढेच गेलेले आहे. त्यातही मागील दोन वर्षात प्रगतीचा वेग अधिक होता, असे अजित पवारांनी म्हटले. तसेच , राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारला लोकांनी भरभरुन प्रेम दिलं असून महायुती भक्कम आहे. पुढील पाच वर्षे या सरकारला ब्रम्हदेव आला तरी धक्का लावू शकत नाही, असेही अजित पवारांनी भाषणातून सभागृहात ठणकावून सांगितले. नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीत या, मुख्यमंत्री करू, अशी ऑफर दिली होती. त्यावरुनही अजित पवारांनी टोला लगावला.
तुम्हीही काही काळ सत्तेत होता, तुमचे श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती नाही. चांगल्याला चांगले म्हणण्याचा माझा स्वभाव आहे. तुम्हाला मात्र मागील पाच वर्षात राज्याने प्रगतीच केली नाही, असं म्हणायचं असेल तर त्यातील काही काळ तुम्हीही सत्तेवर होता, याचाही विचार करा आणि जबाबदारीने बोला, अशी माझी विनंती असल्याचे अजित पवारांनी विरोधकांना उद्देशून म्हटले. काहीजण स्मारक बांधा असे म्हणाले, तुम्हाला आरे म्हणता येत असेल तर आम्हाला ही कारे म्हणता येईल. सर्वानी तारतम्य बाळगलं पाहिजे. विजय वडेट्टीवार हे माझे सहकारी होते, ते विरोधी पक्षनेते राहीले आहेत. दादा, कुठे गेला तुमचा वादा ? असेही अनेकांनी भाषणात विचारले. त्यांना आणि स्मारके बांधण्याची, सन्माननीय व्यक्तींच्या अवमानाची भाषा करणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो, असे म्हणत अजित पवारांनी शायरीच म्हटली.
जिसे, निभा ना सकू, ऐसा, वादा नहीं करता
जिसे, निभा ना सकू, ऐसा, वादा नहीं करता
मै, बातें, अपने ताकत से, ज्यादा, नहीं करता
तमन्ना रखता हु, आसमान, छु लेने की,
तमन्ना रखता हु, आसमान, छु लेने की,
लेकीन, औरोंको, गिराने का, इरादा नहीं रखता…..
या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या काही योजना बंद केल्याचे प्रसार माध्यमही दाखवत होते. सभागृहातही काही सन्माननीय सदस्यांनी याचा उल्लेख केला. मला तुम्हाला सांगायचं आहे की, काही योजना ह्या त्या त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार सुरु केल्या जातात. सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात. कितीही किंमत मोजावी लागली तरी महायुती सरकार लोकोपयोगी योजना बंद करणार नाही, असा शब्दच अजित पवारांनी सभागृहातून दिला. कोविडमध्ये आपण काही योजना, सवलती सुरु केल्या. त्या कोविड संपल्यावर बंद कराव्या लागल्या. काही वेळा केंद्र शासनाकडून राज्याकडील योजनेप्रमाणेच लाभ देणारी नवीन योजना येते. डबल योजना नको म्हणून आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून आपली योजना आपण बंद करतो, यात काहीचं चुकीचं नाही. यापूर्वीही हे अनेकवेळा झालेलं आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, असा गैरसमज पसरवू नका, असा टोला विरोधकांना लावला.
विकसित भारत, विकसित महाराष्ट्र
आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की, आपल्या देशाच्या पंतप्रधान महोदयांनी एक “लक्ष्य” ठरवलेलं आहे. 2047 पर्यंत आपला देश हा विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसलेला असेल. महाराष्ट्र, विशेष करुन मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. नेहमीच महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीत पूर्वीपासून सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान महोदयांनी आपल्या देशासाठी निश्चित केलेलं लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. महाराष्ट्र सर्वांपेक्षा जास्त योगदान देईल, हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळेच “विकसित भारत, विकसित महाराष्ट्र” हा मी 10 मार्चला सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे, असे अजित पवार म्हणाले.
नाना पटोलेंना टोला, 5 वर्षे महायुती भक्कम
काहीजण उगच काहीही बोलतात, आमच्याकडे या मुख्यमंत्री करू म्हणतात. पण, तुमच्याकडं माणसंच नाहीत. तुमच्याकडे 15-20 टाळकी अन् मुख्यमंत्री करू म्हणतात. पण, पुढील पाच वर्ष या सरकारला ब्रम्हदेव आला तरी धक्का लावू शकत नाही, असेही अजित पवारांनी ठणकावून सांगितले. अजित पवारांनी नाव न घेता नाना पटोले यांना टोला लगावला.
राज्याचा प्राधान्यक्रम 5 गोष्टींसाठी
राज्याच्या खर्चाचा प्राधान्यक्रम गरजेनुसार बदलत असतो. यावेळी विकसित देश आणि विकसित महाराष्ट्रासाठी खालील पाच प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि समाजातील सर्व घटकांसाठी विकासात्मक योजना. या क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की, राज्याच्या दळणवळणाच्या सुविधांकडे सरकार विशेष लक्ष देतं आहे आणि यापुढेही देणार आहे.
दळणवळण सुविधांकडे विशेष लक्ष
रस्त्याचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेत वाढ होते, शेतकऱ्यांचा वाहतुकीवरचा खर्च कमी होतो, इंधनावरील राज्याच्या, देशाच्या परकीय चलनात बचत होते आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होते. त्यासाठी अर्थसंकल्पात रस्ते बांधणीसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047, ज्याचा उल्लेख माझ्या अर्थसंकल्पीय भाषणात केला… तो याच विचारावर आधारीत आहे. मला विश्वास आहे….रस्त्यांच्या संदर्भातला हा आमचा संकल्प विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दीष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही, असेही अजित पवारांनी म्हटले.