महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. या योजनेच्या 1500 रुपयांची महिलांना प्रतीक्षा आहे.

मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै  2024 पासून सुरु केलेली आहे. या योजनेच्या  7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे  1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत. अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू, जरी वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली साधनसंपत्ती कशी वाढवली येईल. कुठल्याही परिस्थितीत भांडवली खर्चावर त्याचा परिणाम होणार नाही. भांडवली खर्चासाठी वेगवेगळ्या काय पद्धती असतील याचा विचार करतो आहोत.

आमच्या फ्लॅगशीप योजना कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी  लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही. ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की नियमाच्या जे बाहेर आहेत, त्यांनाच एक प्रकारे, त्याच्या मध्ये विरोधकांनी लिहिलं 10 लाख नाव कमी झाली वगैरे… आपल्यावर कॅगनं टाकलेलं बंधन आहे. एखादी योजना सुरु केल्यानंतर त्यात बसणाऱ्यांना पैसे देण्यात येतात. जे योजनेत बसत नाहीत त्यांना पैसे देता येत नाहीत. आम्ही त्याच पुरती कारवाई केलेली आहे. बाकी देशात अशा प्रकारच्या योजनांमध्ये सर्वात जास्त लोकांना शासकीय मदत देणारं राज्य महाराष्ट्र ठरणार आहे, हा विश्वास देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्र मिळणार?

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  15 फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याचं सांगितलं होतं. त्याच भाषणात अजित पवार यांनी पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, असं म्हटलं होतं. मात्र, संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असल्यानं मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात. म्हणजेच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये मिळू शकतात.

इतर बातम्या : 

बाजारातील घसरणीच्या ट्रेंडचा फटका,डी मार्टचे दमानी, झुनझुनवाला कुटुंबासह बड्या गुंतवणूकदारांना धक्का,तब्बल 81000 कोटी बुडाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button