महाराष्ट्र

सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखान केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal : संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या सावरकरांना पुरस्कार दिला जातो यावरून भाजपची प्रवृत्ती समजते असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धवन सपकाळ म्हणाले.

वर्धा : गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखान केलं, सावकरांनी घाणेरडे आणि अश्लील लिखान केलं आणि त्याच विचारांचे पाईक म्हणून मुख्यमंत्री काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. भाजपचा हेतू साध्य करण्यासाठी भिडेंसारखी किडे प्रवृत्ती कार्यरत आहे असंही ते म्हणाले. नागपूरचा कोणीतरी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतो आणि पोलिस त्याला सुरक्षा देतात त्याचा धिक्कार आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ते वर्ध्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं आणि तेच सावरकर संभाजी महाराजांबद्दल अपमानकारक मजकूर लिहितात. त्यांच्या गीताला संभाजी महाराजांच्या नावे असलेला पुरस्कार दिला जातो. हा जो खेळ चाललेला आहे, त्यातून भारतीय जनता पार्टीला कोणत्या विचारांनी वाटचाल करायची आहे आणि राजकारण करायचं आहे हे स्पष्ट निदर्शनास येते. या संपूर्ण किडे प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

गोळवलकर, सावरकरांनी आक्षेपार्ह लिखान केलं

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “छावा चित्रपट सर्वत्र गाजतो आहे. संभाजी महाराजांचे प्रारूप आणि स्वरूप समाजापुढे येत आहे. शिवजयंतीपासून काँग्रेसची मागणी आहे की छावा चित्रपट हा टॅक्स फ्री करावा, त्यातील जीएसटी हा रद्द करावा. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा चित्रपट टॅक्स फ्री करायला तयार नाही. याचं कारण काय तर चिटणीसांच्या बखारीमध्ये संभाजी महाराजांच्या विरोधात लिखाण करण्यात आलं आहे. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांबाबत ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये गोळवलकर गुरुजींनी अत्यंत आक्षेपार्ह आणि अत्यंत निराधार स्वरूपाचे बदनामीकारक मजकूर लिहिला आहे. सावरकरांनी देखील संभाजी महाराजांच्या विरोधात अत्यंत घाणेरडे आणि अत्यंत अश्लील स्वरूपाचे लिखाण केले आहे. या सर्वांच्या विचाराचे पाईक म्हणून कुठे तरी मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ काम करीत आहे. संभाजी महाराजांचा चित्रपट जे लोक टॅक्स फ्री करत नाहीत त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार.”

भाजपची ही किडे प्रवृत्ती 

भाजप पक्षातील नेत्यांवर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “मुह में राम आणि बगल मे छूरी अशी भाजपाची एकूणच कार्यपद्धती आहे. संविधानाला अभिप्रेत असलेला समाजवाद, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, वारकरी संप्रदाय, शिवाजी महाराज, संभाजी महाराज या सर्व विचारांच्या विपरीत काम करणं हे भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षांचा मूळ हेतू आहे. हे आंबेवाले बाबा असतील, हे कुंकूवाले  हे जे किडे आहेत ज्यांना भिडे म्हणतात. जातीभेदाचे आणि मनुस्मृतीचे किडे त्यांच्या डोक्यात पडले आहेत. हे अशा प्रकारची सातत्याने वक्तव्यं करत असतात.”

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला सुरक्षा

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांच्या संदर्भात जो अपमान करण्यात येत आहे त्याबद्दल उत्तरही या सरकारने दिलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा असा यांचा कार्यक्रम आहे. नागपूरचा कोणी माणूस इतिहासकारांना शिवीगाळ करतो आणि शिवीगाळ करताना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करतो, त्यांचा अपमान करतो. पोलिस त्याला सुरक्षा देतात. पोलिस समोरच्या दारात उभे राहतात आणि मागच्या दाराने आरोपी पसार होतो. कोणीतरी अभिनेता हा जो संभाजी महाराज, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो. त्यालाही सुरक्षा दिली जाते.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button